रत्नागिरी : घरातील गणरायाचे विसर्जन करून कुटुंबीय आनंदाने घरी परतले; मात्र घरी आल्यानंतर वडील अंगणात दिसत नसल्याने सुरू झालेला शोध अखेर हृदयद्रावक घटनेने संपला. जुवे चव्हाणवाडी येथील सार्वजनिक विहिरीत बुडून ५९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. चंद्रशेखर विनायक चव्हाण (वय ५९, रा. जुवे चव्हाणवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास चंद्रशेखर चव्हाण यांचे कुटुंबीय तसेच वाडीतील नागरिक गणेश विसर्जनासाठी गेले होते. त्यावेळी चंद्रशेखर चव्हाण हे घराच्या अंगणातच होते. रात्री सव्वाआठच्या सुमारास गणेश विसर्जन आटोपून कुटुंबीय घरी परतले. मात्र, चंद्रशेखर चव्हाण अंगणात दिसून न आल्याने त्यांचा मुलगा अनमोल चव्हाण आणि त्यांच्या आईने परिसरात शोध सुरू केला.
शोध घेत असताना घरासमोरील वाडीतील सार्वजनिक विहिरीजवळ चंद्रशेखर चव्हाण यांच्या चपला, हातातील काठी आणि मोबाईल आढळून आला. त्यामुळे ते विहिरीत पडले असावेत, असा संशय कुटुंबीयांना आला. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी विहिरीत शोध घेतला असता पाण्यात त्यांचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच चंद्रशेखर चव्हाण यांचे चुलत भाऊ विनायक मारुती चव्हाण यांनी विहिरीत उतरून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून जुवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी मृताचे पुत्र अनमोल चव्हाण यांनी दिलेल्या खबरीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्र. १२०/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास व कायदेशीर प्रक्रिया रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.






