रत्नागिरी: भविष्यात केवळ पदवी उपयोगी पडणार नसून ‘स्कील’ (कौशल्य) हेच खरे भविष्य ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नव्या तंत्रज्ञानाच्या या युगात युवकांनी आपली कौशल्ये सातत्याने अपग्रेड करणे अत्यंत गरजेचे आहे, असे परखड प्रतिपादन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
स्थानिक गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी उपस्थित युवक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासातील प्रेरणादायी अनुभव मांडले. एका छोट्या गावातील सामान्य कुटुंबातून ते जिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास कथन करताना ते म्हणाले की, सुरुवातीला हिंदी माध्यमातून शिक्षण झाल्यानंतर इंग्रजीत जुळवून घेताना अपयश आले, मात्र चिकाटी, सातत्य आणि शिस्तीच्या जोरावर नवीन कौशल्ये शिकत हा टप्पा गाठता आला. ‘द अॅटोमिक हॅबिट्स’ या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी दररोज केवळ एक टक्का प्रगती करत राहिल्यास चक्रवाढ पद्धतीने मोठे यश साध्य करता येते, हा कानमंत्र दिला. नोकरीची सुरुवात करताना केवळ वेतनावर समाधानी न राहता कामातील बारकावे आणि तंत्रज्ञान शिकून प्रत्येकाने भविष्यात उद्योजक बनण्याचा विचार केला पाहिजे. मायकेल डेल यांचे उदाहरण देत त्यांनी नोकरी करताना दिवसातील किमान एक तास स्वतःचे कौशल्य वाढवण्यासाठी देण्याचे आवाहन केले. तसेच उद्योग सुरू करण्यासाठी तरुणांनी ‘सीएमईजीपी’ आणि ‘पीएमईजीपी’ यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी आजच्या बदलत्या औद्योगिक युगात केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसून विद्यार्थ्यांनी संभाषण चातुर्य, तांत्रिक व डिजिटल कौशल्यांसोबत सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे नमूद केले. युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्योग जगताकडे वळून ‘जॉब क्रिएटर’ बनावे, असे आवाहन त्यांनी केले. सुमारे २३ नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी या महाकुंभात सहभागी झाले होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त दत्ता चव्हाण यांनी केले. या मेळाव्यास विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, प्राध्यापक वर्ग आणि मोठ्या संख्येने पदवीधर तरुण उपस्थित होते.






