खेडमध्ये ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ उत्साहात
खेड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ खेड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. राज्यव्यापी मोहिमेचा भाग म्हणून आयोजित या भव्य रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. खेड परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना हक्काच्या रोजगाराची संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.
मेळाव्यादरम्यान भाजप नेते तथा खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी सहभागी विविध कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास (HR) अधिकाऱ्यांशी व प्रतिनिधींशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक तरुणांना तात्पुरत्या स्वरूपावर न ठेवता कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यावर भर दिला. जर कंपन्यांनी स्थानिक भूमिपुत्रांना कायम नोकऱ्या दिल्या नाहीत, तर त्यांना जाब विचारण्यात येईल, असा कडक इशारा त्यांनी दिला. तसेच खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये दीडशेहून अधिक कंपन्या कार्यरत असताना या रोजगार महाकुंभात केवळ १५ कंपन्यांनी सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या रोजगार मेळाव्याप्रसंगी भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर, खेड पंचायत समितीच्या सभापती डॉ. आफिया पालेकर, नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, नगरसेविका वैभवी खेडेकर, भाजप खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तथा माजी नगराध्यक्ष उर्मिला शेट्ये-पाटणे, शहराध्यक्षा आशा सनगरे, नगरसेवक निकेतन पाटणे, स्वप्निल सैतवडेकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश भुवड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल होळकर, शुभम गायकवाड, अजय तोडकरी, सुयश खेडेकर, विजय गुप्ता, सर्वेश पवार, विनायक शिरगावकर, आनंद खेडेकर, बाळू वर्मा, श्याम तावडे, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात तालुक्यातील शेकडो युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगारासाठी मुलाखती दिल्या.






