गणपतीपुळे (वैभव पवार): महाराष्ट्र शासन कृषी विभाग, रत्नागिरी यांच्या वतीने मालगुंड ग्रामपंचायत कार्यालयात महिला शेतकरी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. शेती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात परिसरातील शेतकरी महिलांना मान्यवरांच्या हस्ते अधिकृत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश उर्फ राजू साळवी, रत्नागिरी पंचायत समितीच्या सदस्या पूर्वा दुर्गवळी, मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर आणि उपसरपंच स्मिता दुर्गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे नेटके नियोजन मंडळ कृषी अधिकारी वर्षा नवलकर व कृषी सहाय्यक कृष्णा गाडवे यांनी केले होते.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या शुभदा मुळ्ये, शिल्पा पवार, सदस्य नितीन दुर्गवळी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विलास राणे, शिरीष लिंगायत, पोलीस पाटील शशिकांत पवार, अमोल राऊत, निधी मांडवकर, आस्था पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी मिलिंद खेऊर, विजय पाटील, निशिगंधा कोसुंबकर यांच्यासह गावातील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शासनाच्या योजनांचा लाभ घेत महिलांनी कृषी क्षेत्रात स्वावलंबी व्हावे, असा सूर या वेळी मान्यवरांनी व्यक्त केला.





