रत्नागिरी (सिकंदर फरास/दाभोळे): शासकीय नियमांनुसार राज्यभरात ग्रामपंचायतींच्या शाळा, नळपाणी पुरवठा योजना तसेच स्ट्रीट लाईटचे वीज मीटर स्मार्ट मीटरमध्ये बदलण्याची मोहीम राबवली जात असतानाच, तांत्रिक अडचण आणि स्मार्ट मीटरच्या कट-ऑफ सिस्टीमचा मोठा फटका रत्नागिरी परिसरातील नागरिकांना बसला. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत महावितरणकडे वीज देयके अदा करण्याची नियमित प्रशासकीय पद्धत सुरू असतानाही, महावितरणने अचानक वीज पुरवठा खंडित केल्यामुळे मिरजोळे, मजगाव आणि केल्ये या तिन्ही ग्रामपंचायतींचे रस्ते तीव्र अंधारात बुडाले होते.
उन्हाळ्याच्या दिवसांत रात्रीच्या वेळी परिसरात सापांचा वाढलेला वावर आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आढळणाऱ्या बिबट्याची दहशत यामुळे नागरिक आधीच प्रचंड भीतीखाली वावरत होते. अशा नाजूक व गंभीर स्थितीत स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा बंद पडल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा गहन प्रश्न ऐरणीवर आला होता. अंधाराचे हे भीषण वास्तव आणि जनतेची होणारी अडचण समोर आणण्यासाठी मजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते फैयाज मुकादम यांनी पुढाकार घेत सोशल मीडियावर एक सविस्तर मेसेज तयार करून तो प्रसारित केला.
जनतेच्या त्रासाची ही समाजमाध्यमांवरील बातमी समोर येताच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि संगमेश्वर-लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने व तातडीने दखल घेतली. निधी हस्तांतरणाची प्रशासकीय प्रक्रिया किंवा तांत्रिक कारणांचे दाखले देऊन सामान्य नागरिकांना अशा प्रकारे वेठीस धरणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही, अशा कडक शब्दांत लोकप्रतिनिधींनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावले. यासोबतच कसलाही विलंब न लावता तिन्ही गावांमधील बंद पाडलेला स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा त्वरित पूर्ववत करण्याचे थेट व सक्त आदेश दिले.
पालकमंत्री आणि आमदारांच्या या धडक हस्तक्षेपानंतर वीज मंडळाच्या यंत्रणेने वेगाने हालचाली सुरू करत मिरजोळे, मजगाव आणि केल्ये ग्रामपंचायत परिसरातील स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा तातडीने सुरळीत केला. अंधार नाहीसा होऊन रस्ते पुन्हा दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाल्याने त्रस्त ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. स्थानिक पातळीवरील या बिकट समस्येचे गांभीर्य ओळखून ती मार्गी लावल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते फैयाज मुकादम यांच्यासह तिन्ही ग्रामपंचायतींच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांचे आभार मानण्यात आले.





