गणपतीपुळे (वैभव पवार): जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा महापूर आला आहे. या गर्दीमुळे गणपतीपुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले असून, यंदाच्या हिवाळी पर्यटन हंगामाची दणक्यात सुरुवात झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. पावसानंतर आता समुद्र शांत झाल्याने पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले वॉटर स्पोर्ट्सही किनाऱ्यावर दाखल झाले आहेत. ऑक्टोबर ते मे या अधिकृत हंगामात मिळणाऱ्या परवानगीनुसार किनाऱ्यावर विविध साहसी जलक्रीडा सुरू झाल्या असून, जेट स्की, ड्रॅगन राईड, बनाना राईड आणि डिस्को राईडचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे.
स्वयंभू श्रींच्या चरणी माथा टेकवण्यासाठी मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, दर्शनानंतर पर्यटक गणपतीपुळ्याचे नयनरम्य निसर्गसौंदर्य आणि अथांग अरबी समुद्राचा मनमुराद आनंद लुटत आहेत. वॉटर स्पोर्ट्ससोबतच किनाऱ्यावरील एटीव्ही बाईक, उंट आणि घोड्यांची रपेट तसेच स्थानिक फोटोग्राफी व्यवसायालाही चांगली गती मिळाली आहे. याशिवाय नारळपाणी, शहाळी, सरबत, भेळ आणि विविध खाद्यपदार्थांचे छोटे-मोठे स्टॉल्स पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. सलग सुट्ट्यांच्या निमित्ताने पर्यटनाला नवसंजीवनी मिळाल्यामुळे स्थानिक व्यापारी, व्यावसायिक आणि हॉटेल चालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून आगामी दिवसांत ही गर्दी आणखी वाढण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.




