नाटे: नाटे ते रत्नागिरीदरम्यान धावणाऱ्या सुमो आणि जीप वडाप वाहतुकीतील काही चालकांचा वाढता बेदरकारपणा सध्या रस्त्यावरील इतर नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या थेट जीवावर बेतणारा ठरत आहे. ग्रामीण भागातील दळणवळणाचा कणा मानल्या जाणाऱ्या या वाहतुकीत प्रामाणिक चालकांची संख्या मोठी असली, तरी मोजक्या बेजबाबदार चालकांच्या अवाजवी अतिवेगामुळे संपूर्ण मार्गावर भीषण अपघातांची भीती वाढली आहे. नाटे-पावस-रत्नागिरी हा मार्ग अनेक ठिकाणी अरुंद, तीव्र वळणावळणांचा आणि चढ-उतारांचा असतानाही, अधिकच्या फेऱ्या वाढवण्याच्या घाईत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून ओव्हरलोडिंग आणि तीव्र वळणावर धोकादायक ओव्हरटेकिंग करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. यापूर्वीही कोकणातील अशा अंतर्गत मार्गांवर घडलेल्या गंभीर अपघातांत निष्पाप प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले तर काहींना नाहक जीव गमवावा लागला, तरीही त्या ताज्या घटनांमधून कोणताही धडा न घेता प्रवाशांचा जीव टांगणीला लावला जात आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय आणि हातावर पोट असणाऱ्या चालकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह लक्षात घेऊन पोलिस व वाहतूक प्रशासन अनेकदा या वाहतुकीकडे सहानुभूतीच्या दृष्टीने पाहते, कोणाच्या पोटावर पाय येऊ नये हा त्यामागील उदात्त हेतू असतो. मात्र, प्रशासनाच्या याच सहानुभूतीचा आणि मोकळीकीचा गैरफायदा घेत काही चालक नियमांचे उघड उल्लंघन करत असून, कोणालाही प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा परवाना मिळालेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या मार्गावर अत्यंत संयमाने, वेगाचे भान ठेवून आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत अनेक वर्षे सेवा देणाऱ्या चालकांची संख्या मोठी असताना, मोजक्या तरुणांच्या बेदरकार ड्रायव्हिंगमुळे संपूर्ण वडाप व्यवसायाची नाहक बदनामी होत आहे. उद्या प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यास या प्रामाणिक व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्रवाशांनी आणि नागरिकांनी पुढे येऊन धोकादायक पद्धतीने गाडी चालवणाऱ्या चालकांना तत्काळ थांबवून शांततेने पण ठामपणे समज देणे गरजेचे बनले आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यानंतर पंचनामे आणि कारवाईचे सोपस्कार करण्यापेक्षा वेळीच शहाणपण दाखवून चालकांनी आत्मपरीक्षण करावे आणि सुरक्षित ड्रायव्हिंग अंगीकारावे, अन्यथा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलावी लागतील असा ठाम सूर नाटे परिसरातून उमटत आहे.







