पाचल (अंकुश पोटले): गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेच्या फेऱ्यात अडकलेल्या राजापूर तालुक्यातील तळवडे अंतर्गत ताम्हाणे फाटा ते मूर सुतारवाडी या रस्त्याच्या कामाला अखेर दिवाळीपूर्वी मुहूर्त सापडला आहे. गेली दोन-तीन वर्षे अत्यंत दयनीय आणि धोकादायक बनलेल्या या ६ किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या नूतनीकरणाचे काम आता प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी, वृद्ध आणि महिलांना अतोनात हाल सोसावे लागत होते. तसेच खड्डे आणि अरुंद मार्गामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असल्याने येथे लहान-मोठ्या अपघातांची मालिकाच सुरू होती. या गंभीर समस्येकडे पत्रकार बंधूंनी सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. अखेर, राजापूर शहर आणि ग्रामीण पत्रकार संघ (पाचल मर्यादित) यांनी आमदार किरण (भैया) सामंत यांच्याकडे या रस्त्याबाबत सविस्तर पत्रव्यवहार करत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. आमदार सामंत यांनी या समस्येची तत्परतेने दखल घेत, विशेष प्रयत्नातून या मार्गाच्या रुंदीकरण, खडीकरण आणि डांबरीकरणासाठी आवश्यक तो निधी मंजूर करून आणला. त्यांच्याच भक्कम पाठपुराव्यामुळे मागील वर्षी अपूर्ण राहिलेल्या या कामाला आता वेग आला असून, या रस्त्याचे काम लांजा येथील ‘साईराज भिंगार्डे एस. कन्स्ट्रक्शन’ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली ताम्हाणे फाटा ते मूर सुतारवाडी या शेवटच्या टप्प्यापर्यंतचे हे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. रस्त्यासाठी अडथळा ठरणारी बाजूची आणि मधली अतिक्रमणे व अडचणी दूर करण्यात आल्यामुळे, हा रस्ता आता चक्क दुपदरी स्वरूपात आकारास येत असल्याचे चित्र आहे. या ऐतिहासिक विकासकामांतर्गत केवळ डांबरीकरणच नव्हे, तर रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण, योग्य दर्जाची साईड पट्टी आणि भक्कम गटार लाईन यांसारखी कामे परिपूर्ण रीतीने केली जाणार आहेत. हा रस्ता शास्त्रोक्त आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्यास या भागातील अपघातांचे प्रमाण कायमचे संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. अनेक वर्षांची तीव्र कोंडी फुटल्याने संपूर्ण विभागातील प्रवासी, वाहनचालक आणि जनतेमधून समाधान व्यक्त केले जात असून, आमदार किरण उर्फ भैय्यासाहेब सामंत यांचे आभार मानले जात आहेत. दरम्यान, या महत्त्वाकांक्षी रस्त्याचे काम अतिशय दर्जेदार, मजबूत आणि लोकाभिमुख व्हावे, यासाठी परिसरातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, सुजाण नागरिकांनी आणि पंचक्रोशीतील जनतेने प्रत्यक्ष जागेवर लक्ष ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक पातळीवरून केले जात आहे.






