राजापूर : राजापूर तालुक्यातील ससाळे परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रानगव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, हे वन्यप्राणी आता थेट गावाच्या मध्यवर्ती लोकवस्तीत शिरू लागल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. काही दिवसांपूर्वी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास श्री गांगेश्वर मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावरच गव्यांचा कळप ग्रामस्थांच्या थेट दृष्टीस पडला. भरवस्तीत आणि रस्त्यावरच गवे उभे ठाकत असल्याने सकाळच्या प्रहरी कामासाठी बाहेर पडणारे शेतकरी, महिला आणि वाटसरूंच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. अचानक समोर येणाऱ्या या धिप्पाड प्राण्यांमुळे कधीही गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी रास्त भीती व्यक्त होत असून शेतात जाणेही आता ग्रामस्थांसाठी धोक्याचे बनले आहे.
या वाढत्या उपद्रवाचा सर्वाधिक फटका परिसरातील शेती आणि बागायतींना बसत असून गव्यांच्या कळपाने काजू बागा अक्षरशः तुडवून उद्ध्वस्त केल्या आहेत. स्थानिक शेतकरी पांडुरंग शिवगण यांच्यासह परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या काजू कलमांचे गव्यांनी अतोनात नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेली कलमे मोडतोड झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आधीच विविध नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर या वन्यजीवांच्या त्रासामुळे मोठे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने केवळ कागदी घोडे न नाचवता तातडीने ससाळे परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी, गव्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना संरक्षण द्यावे, तसेच कृषी विभागाच्या समन्वयाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.






