नाटे : राजापूर तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे नाटे अंतर्गत येणाऱ्या नाणार इंगलवाडी येथील खाडीच्या पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असतानाच, या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या मायरा जुनेद भाटकर या बालिकेचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने युद्धपातळीवर व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे. या प्रकरणी सागरी पोलीस ठाणे नाटे येथे अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २७/२०२६, २८/२०२६ आणि २९/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून, बुशरा जुनेद भाटकर, मोहम्मद जुनेद भाटकर आणि जुवेरिया जुनेद भाटकर यांचे मृतदेह हाती आले आहेत. मात्र, त्यांच्यासोबत पाण्यात बुडालेली चिमुरडी मायरा अद्याप मिळून न आल्याने तिच्या शोधासाठी यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या थेट नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली कोस्टगार्डचे कमांडो तसेच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने खाडी आणि लगतच्या सागरी परिसरात कसून शोध घेतला जात आहे. घटनास्थळावर लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, नाटे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह नाटे पोलीस ठाण्याचे १० अंमलदार आणि सागरी सुरक्षा दलाचे १० होमगार्ड परिस्थितीवर लक्ष ठेवून शोधकार्यात सक्रिय आहेत. याशिवाय रत्नागिरी पोलीस नौका विभागाचे जवान, कायकिंग बोटी आणि विशेषतः मालवण येथून पाचारण करण्यात आलेले निष्णात स्कुबा डायव्हिंग पथक पाण्याच्या तळाशी जाऊन शोध घेत आहे. खाडीतील पाण्याचा प्रवाह आणि भौगोलिक आव्हानांचा सामना करत बेपत्ता मायराचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि बचाव पथकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.




