राजापूर (तुषार पाचलकर): तालुक्यातील पाचल येथील नामांकित सामाजिक संस्था नेहरू युवा चैतन्य युवक मंडळाच्या वतीने यंदाही नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आयोजित धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना राजापूर पंचायत समितीच्या सभापती सौ. नंदिनी कदम यांच्यासह परिसरातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट देऊन श्रीदुर्गामातेचे मनोभावे दर्शन घेतले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. सिद्धाली मोरे, राजापूर पंचायत समिती सदस्या सौ. अपेक्षा मासये आणि सौ. समीक्षा वाफेलकर यांची विशेष उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासमवेत पदाधिकारी हर्षदा खानविलकर, मधुरा खानविलकर, सिद्धी शिर्षेकर यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मंडळातर्फे सर्व मान्यवर पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने शाल व श्रीफळ देऊन यथोचित स्वागत करण्यात आले.
मंडळाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा कौतुकास्पद असल्याचे नमूद करत उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढील समाजोपयोगी कार्यासाठी पाठबळ व्यक्त केले. या सदिच्छा भेटीप्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचल परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.





