रत्नागिरी : तालुक्यातील नाचणे, विनम्रनगर येथील गणराज रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या एका ५४ वर्षीय प्रौढाने दीर्घकालीन मणक्याच्या आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबासाहेब महादेव भागवत (वय ५४ वर्षे, रा. गणराज रेसिडेन्सी, विनम्रनगर, नाचणे, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत बाबासाहेब भागवत हे गेल्या काही काळापासून मणक्याच्या तीव्र आजाराने त्रस्त होते. या असह्य शारीरिक व्याधी आणि आजारपणाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.१५ या कालावधीत, राहत्या घरातील बेडरूममध्ये बेडवर लाकडी स्टूल ठेवून त्यांनी छताच्या पंख्याला स्कार्फच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ (BNSS) चे कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक १४१/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.







