चिपळूण : रेल्वे स्थानकावर क्षुल्लक दुर्लक्ष किंवा घाईगडबड किती जीवघेणी ठरू शकते आणि त्याच वेळी कर्तव्यावर असलेल्या जवानाची सतर्कता एखाद्याला कसे जीवनदान देऊ शकते, याचा प्रत्यय चिपळूण रेल्वे स्थानकावर आला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ड्युटीवर असणारे होमगार्ड रोहित चिले यांच्या तत्परतेमुळे रेल्वे आणि फलाटाच्या गॅपमध्ये पडणाऱ्या एका प्रवाशाचे प्राण वाचले असून, त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
१६ सप्टेंबरच्या रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर रात्रपाळीची गस्त घालत असताना डबा क्रमांक १५-१६ जवळ गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका प्रवाशाचा अचानक तोल गेला. तोल जाऊन तो थेट रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरात खेचला जाण्याच्या बेतात असतानाच होमगार्ड चिले यांच्या ही बाब क्षणात लक्षात आली. काही सेकंदांचाही उशीर या प्रवाशाच्या जीवावर बेतला असता; मात्र चिले यांनी कसलाही विचार न करता तात्काळ तिकडे धाव घेतली आणि प्रवाशाला खेचून सुखरूप बाहेर काढले. केवळ ड्युटीवर हजेरी लावणे नव्हे, तर आणीबाणीच्या प्रसंगी योग्य निर्णय घेऊन कर्तव्य बजावणे कशाला म्हणतात, हे त्यांच्या या कृतीने सिद्ध केले.
या उल्लेखनीय व धाडसी कामगिरीची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना चिपळूण शहराच्या वतीने रेल्वे स्थानकावर जाऊन रोहित चिले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे आणि जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला. या वेळी विभाग अधिकारी राहुल गुरव, शिवसैनिक मनिष कोलगे, वेदांत शितप यांच्यासह रेल्वे पोलीस उपनिरीक्षक दुदुमकर, चिपळूण तालुका पथक समादेशक अधिकारी तुषार मिस्त्री, जीआरपी पोलीस खांडेकर, होमगार्ड ओंकार पवार, राज चिले, सर्जेराव मोलावडे उपस्थित होते. प्रवाशांनी धावत्या गाडीत चढणे किंवा उतरणे टाळावे आणि प्लॅटफॉर्मवरील सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असा महत्त्वाचा संदेशही या घटनेतून अधोरेखित झाला आहे.





