रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या नव्या आणि मोठ्या आकाराच्या गाड्या ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी सोयीऐवजी डोकेदुखी ठरत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे मार्गावर धावणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे स्थानिक ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, गावातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन या मार्गावर लहान आकाराच्या गाड्या चालवाव्यात, अशी आग्रही मागणी नियमित प्रवासी अब्दुल गणी खतीब यांनी केली आहे.
सैतवडे येथील रस्त्यांची रचना अरुंद आणि जुन्या पद्धतीची आहे. परिणामी, महामंडळाने सुरू केलेल्या नव्या मोठ्या गाड्या गावात नेणे चालकांसाठी कसरतीचे ठरत आहे. रस्त्यावर गाडी कुठे अडकेल किंवा अपघात होईल या भीतीपोटी चालक व वाहक या गाड्या गावाच्या मुख्य वस्तीत न नेता केवळ पोस्ट ऑफिसच्या थांब्यावरूनच परस्पर माघारी वळवत आहेत. एस.टी. प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे गाव अंतर्गत जाणाऱ्या प्रवाशांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे.
एस.टी. गावात येत नसल्याने प्रवाशांना पोस्ट ऑफिस ते गाव असा प्रवास करण्यासाठी खाजगी रिक्षांचा आधार घ्यावा लागत आहे. गावात येण्यासाठी ४० रुपये आणि पुन्हा एस.टी. पकडण्यासाठी पोस्ट ऑफिसपर्यंत जाण्यासाठी अतिरिक्त ४० रुपये, असा एकूण ८० रुपयांचा नाहक आर्थिक भुर्दंड नियमित प्रवाशांवर पडत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे खिसे रिकामे होत असून या परिस्थितीचा थेट आर्थिक फायदा खाजगी वाहतूकदारांना मिळत आहे. याशिवाय या नवीन गाड्यांमधील अंतर्गत आसनव्यवस्थाही गैरसोयीची असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. त्यामुळे महामंडळाने सैतवडे मार्गावरील रस्त्यांची मर्यादा ओळखून तातडीने लहान आकाराच्या गाड्यांची व्यवस्था करावी, अन्यथा ग्रामस्थांचा रोष वाढेल असा इशारा खतीब यांनी दिला आहे.






