मुंबई : आगामी दसरा-दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत वाढ झाली आहे. १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलीपीजी सिलिंडरच्या दरात ६३ रुपयांनी वाढ झाली आहे.
त्यामुळे, आता व्यावसायिकांना मुंबईत २,७६४ रुपयांना मिळणार आहे. तर, दिल्लीत ६२.५० रुपयांनी वाढ झाल्याने सिलिंडर २,८१० रुपयांना मिळणार आहे. दरम्यान घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
या महिन्यात दसरा आणि पुढच्या महिन्यात दिवाळीचा सण आहे. या काळात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिकांकडून सिलिंडरची मागणी वाढते. याच काळात तब्बल ६३ रुपयांनी वाढ झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ९.५० रुपयांची वाढ झाली होती. आता पुन्हा दरवाढ झाली आहे.
इंडियन ऑइलने दिलेल्या दरानुसार मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर तब्बल ६३ रुपयांनी वाढला असून तो २,७०१ रुपयांवरून २,७६४ रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजीची किंमत आता २,९८३ रुपये झाली आहे. उल्लेख केलेल्या शहरांपैकी पाटणामध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली असून, तेथे १९ किलोच्या सिलिंडरचा दर ७१.५० रुपयांनी वाढून ३,१००.५० रुपये झाला आहे. तसेच, लखनऊमध्ये सिलिंडरची किंमत ६२.५० रुपयांनी वाढून २,९३२.५० रुपये झाली आहे. या दरवाढीमुळे स्वयंपाकासाठी एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या संचालन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आले असून, यामुळे घरगुती ग्राहकांना कोणताही तात्काळ बदल किंवा दिलासा मिळालेला नाही.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडर ६३ रुपयांनी महागला
Leave a Comment






