सावर्डे/ विनायक सावंत: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात तब्बल ३२ वर्षे अविरत आणि निष्कलंक सेवा बजावत हजारो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करणारे चिपळूण तालुक्यातील सावर्डे, पिंपळ मोहल्ला येथील रहिवासी मुश्ताक अहमद माद्रे आज सेवामुक्त झाले. त्यांच्या या प्रदीर्घ सेवाकाळात कोणतीही दुर्घटना न घडू देता ‘अपघातविरहित प्रवासी सेवा’ देण्याचा अनोखा आणि उल्लेखनीय आदर्श त्यांनी घालून दिला आहे. विशेष बाब म्हणजे, त्यांचे वडील अहमद माद्रे हेदेखील एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असल्याने माद्रे कुटुंबीयांचे एसटीशी पिढीजात आणि जिव्हाळ्याचे नाते जोडलेले राहिले आहे.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालक म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या मुश्ताक यांनी कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा वारसा अत्यंत समर्थपणे पुढे नेला. सेवेतील अखेरचा प्रवास अविस्मरणीय करण्यासाठी त्यांच्या अखेरच्या फेरीची एसटी बस आकर्षक फुलांच्या माळा व फुग्यांनी सुंदर रीतीने सजविण्यात आली होती. या सजविलेल्या बसमधून शेवटची सेवा पूर्ण करून माद्रे यांचे सावर्डे येथे आगमन होताच उपस्थित नागरिक, सहकारी आणि कुटुंबीयांसाठी तो क्षण अत्यंत भावुक ठरला. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य शौकतभाई माखजनकर, सावर्डे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चव्हाण, स्थानिक व्यापारी, नागरिक, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते; सर्वांनी एकत्र येत माद्रे यांचा पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार केला आणि त्यांच्या ३२ वर्षांच्या संस्मरणीय सेवाकार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख व समाधानाच्या शुभेच्छा दिल्या.







