पाचल : कोकणातील अर्थकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या आंबा व काजू बागांच्या उत्पादनवाढीत मोहोर संरक्षण हा अत्यंत कळीचा टप्पा ठरतो. याच पार्श्वभूमीवर कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत पाचल येथे आयोजित दोन दिवसीय आंबा-काजू मोहोर संरक्षण महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. परिसरातील सुमारे चाळीस महिला शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग नोंदवत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे धडे गिरवले.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ. सिद्धाली मोरे उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र, लांजा येथील विषय विशेषज्ज्ञ डॉ. सुदेश चव्हाण व डॉ. महेश महाले यांनी उपस्थित राहून महिला शेतकऱ्यांना सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. आंबा व काजू पिकांच्या मोहोर अवस्थेचे महत्त्व, मोहोर संरक्षण तंत्रज्ञान, बागेतील प्रमुख कीड व रोगांची प्राथमिक ओळख, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM), योग्य फवारणीचे वेळापत्रक आणि कीटकनाशकांचा सुरक्षित वापर यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला. बदलत्या हवामानात बागेची नियमित पाहणी करून वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे कसे गरजेचे आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह पटवून दिले.
याप्रसंगी मूर गावच्या सरपंच सौ. वैष्णवी आगटे, शिवसेनेचे पाचल विभागप्रमुख विलास नारकर, मूर-वाळवड सोसायटीचे अध्यक्ष अनंत कोलते, उपकृषी अधिकारी अनंत भारती, पाणी फाउंडेशनचे मेंटर माधव गीते तसेच उमेद अभियानाच्या भारतमाता महिला प्रभागसंघाच्या अध्यक्षा सौ. विनया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी पंचायत समिती सदस्य सौ. अपेक्षा मासये यांनी उपस्थित राहून महिलांशी संवाद साधत त्यांच्या शेतीविषयक प्रयत्नांचे कौतुक केले. या सत्रात सहाय्यक कृषी अधिकारी सिरसागर व चौधरी यांनीही तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान महिलांना केवळ वर्गात न ठेवता प्रक्षेत्र भेट आणि प्रत्यक्ष निरीक्षणातून झाडांची स्थिती अभ्यासण्याची संधी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांची मूल्यांकन परीक्षा घेण्यात आली. यामध्ये सौ. समृद्धी संजय जाधव यांनी ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तालुका कृषी अधिकारी अमोल सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वैभव अमरे यांनी या संपूर्ण प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी नियोजन केले. महिला शेतकरी सक्षम झाली तरच ग्रामीण भागातील शेती समृद्ध होईल, हा विश्वास या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.






