राजापूर/ तुषार पाचलकर: कोल्हापूर येथील इमेज इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन अँड सोशल, बिझनेस सेरेमनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारत कर्तव्यम् गौरवगाथा कोल्हापूर २०२६’ या भव्य राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान सोहळ्यात राजापूर तालुक्यातील पाचल येथील नामवंत गायक शरद जाधव (ज्युनिअर आनंद शिंदे) यांना मानाच्या ‘महाराष्ट्र कला भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी कोल्हापूरमधील ऐतिहासिक छत्रपती शाहू स्मारक सभागृहात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
आपल्या अत्यंत भारदस्त आणि खणखणीत आवाजाने संगीतसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शरद जाधव यांनी गायलेली अनेक गाणी त्यांच्या यूट्यूब वाहिनीवर आणि संगीत रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये ‘स्वातंत्र्य दिले तुला भीमरायांनी’, ‘भिम कायद्याचे हत्यार’, ‘करावं काय’, ‘भीमाचं वाचून संविधान’, ‘नेत्यांमध्ये कुठे नवं क्रांती दिसत नाय’ यांसारखी गाजलेली भीमगीते तसेच ‘तुझ्या मोबाईलची रिंगटोन भारी’, ‘पोरीचं रूप हे गोरं गोरं’, ‘लय झकास दिसतेस पोरी’ आणि ‘कारभारी जोडीने लावूया शेती’ ही त्यांची स्वतःची भावगीते व लोकगीते विशेष गाजली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शरद जाधव प्रस्तुत ‘मधुरा’ या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नवोदित व होतकरू गायकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करत कला आणि सामाजिक क्षेत्रात घेतलेली त्यांची ही गरुडभरारी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली असून, मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






