राजापूर / अरबाज नेवरेकर : राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील सामाजिक कार्यकर्ते अस्लम मुकादम यांचे सुपुत्र अफ्फान अस्लम मुकादम याने आपल्या सहकाऱ्यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील आशिया रोबोटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. अफ्फानच्या समूहाने सादर केलेल्या रोबोटिक्स प्रकल्पाला उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, कल्पकता आणि अचूकतेच्या जोरावर सुवर्णपदक मिळाले असून, या यशामुळे वडदहसोळसह राजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आशिया खंडातील विविध देशांमधील संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाची, नावीन्यपूर्ण विचारांची, समस्या सोडविण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष कार्यक्षमतेची विविध टप्प्यांवर कसोटी घेण्यात आली. या आव्हानात्मक स्पर्धेत अफ्फान मुकादम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या रोबोटिक्स प्रकल्पाने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेदरम्यान अफ्फानच्या समूहाने प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण करत रोबोटिक्स तंत्रज्ञानातील आपले कौशल्य दाखवून दिले. प्रकल्पातील तांत्रिक अचूकता, कल्पकता आणि कार्यक्षमतेची दखल घेत परीक्षकांनी समूहाला प्रथम क्रमांकाचा बहुमान जाहीर केला. त्यानंतर अफ्फान व त्याच्या सहकाऱ्यांना सुवर्णपदक प्रदान करून गौरविण्यात आले.
ग्रामीण भागातून आलेल्या अफ्फानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मिळविलेले हे यश विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. तंत्रज्ञान आणि रोबोटिक्ससारख्या आधुनिक क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थीही उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे या यशातून अधोरेखित झाले आहे. अफ्फानच्या या कामगिरीमुळे वडदहसोळ तसेच राजापूर तालुक्यातील विद्यार्थी आणि युवकांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नव्या संधींचा शोध घेण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. अफ्फान मुकादम आणि त्याच्या समूहाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राजापूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






