राजापूर / तुषार पाचलकर: शालेय जिल्हास्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धेत रग्बी असोसिएशन राजापूर आणि जिल्हा परिषद शाळा ओझर नंबर एकच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात राजापूरच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत सांगली येथे होणाऱ्या आगामी विभागीय रग्बी स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले आहे. या यशामुळे राजापूरच्या रग्बी क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण खेळाडूंच्या कामगिरीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
विभागीय स्पर्धेसाठी राजापूरच्या संघातून दुर्वा मंगेश गुरव हिची कर्णधारपदी, तर पल्लवी पांडुरंग मालपेकर हिची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. त्यांच्यासह दुर्वा सतीश रेगे, वैदेही योगेश नवलू, श्रुती नरेश पळसमकर, अनन्या विवेक रेगे, उर्वी अनंत गोसावी, रिया प्रकाश नवलू, काव्या उमेश रांबडे आणि आरोही संजय नवलू या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. १४ वर्षांखालील मुलांच्या गटातही जिल्हा परिषद शाळा ओझर नंबर एकचा खेळाडू साई राजेश गुरव याने प्रभावी कामगिरी करत विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.
दरम्यान, राजापूर तालुक्यातून १४ वर्षांखालील मुलांचा संघही जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत सहभागी झाला होता. या स्पर्धेच्या तयारीदरम्यान खेळाडूंना जिल्हा प्रमुख प्रशिक्षक डॉ. योगिता खाडे, राजापूर तालुका प्रमुख प्रशिक्षक युवराज मोरे आणि सहप्रशिक्षक शैलेंद्र बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेल्या सातत्यपूर्ण सरावाचे आणि मेहनतीचे फलित म्हणून हे यश मिळाले आहे. राजापूरच्या या यशाबद्दल रग्बी असोसिएशन रत्नागिरी संलग्न रग्बी असोसिएशन राजापूरच्या पदाधिकाऱ्यांसह खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, सांगली येथे होणाऱ्या विभागीय रग्बी स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.





