मुंबई : राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देणाऱ्या ‘महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिट’मध्ये विविध क्षेत्रांतील तब्बल ८ लाख ५७ हजार ४५२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ६७ सामंजस्य करार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या महागुंतवणुकीच्या माध्यमातून राज्यात २ लाख ९१ हजार १०९ नव्या रोजगारांची निर्मिती होणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाधारित उद्योग आणि औद्योगिक विस्ताराला नवी दिशा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या शिखर परिषदेत डेटा सेंटर्स, माहिती-तंत्रज्ञान आणि सेमिकंडक्टर या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांनी सर्वाधिक बाजी मारली असून, यात ४ लाख १५ हजार ४९० कोटी रुपयांची घसघशीत गुंतवणूक प्रस्तावित आहे. ऊर्जा, क्लीनटेक, नवीकरणीय ऊर्जा, बॅटरी एनर्जी आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस या पर्यावरणपूरक क्षेत्रांमध्ये १ लाख २ हजार ५१९ कोटींचे करार झाले आहेत. एरोस्पेस अँड डिफेन्स तसेच ऊर्जा आणि क्लीनटेक क्षेत्रात प्रत्येकी १० महत्त्वाच्या करारांचा समावेश असून, अंतरिक्ष व संरक्षण क्षेत्रात २७ हजार ९३० कोटी रुपये तर मेटल्स आणि मायनिंग क्षेत्रात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित झाली आहे.
याव्यतिरिक्त पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स व बांधकाम साहित्य क्षेत्रात १८ हजार ७५१ कोटी, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात १२ हजार ६५१ कोटी, स्टील उत्पादन क्षेत्रात ७ हजार कोटी, आरोग्य क्षेत्रात ६ हजार ५०० कोटी तसेच केमिकल्स, शेती, सेवा आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) क्षेत्रात ८ हजार ८०१ कोटी रुपयांचे करार करण्यात आले आहेत; तर इतर विविध क्षेत्रांत १ लाख ८२ हजार ८१० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या या व्यापक करारांमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक भरारीला मोठी ऊर्जा मिळणार आहे.






