राजापूर: रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या सहकार्याने आणि पोलीस उपनिरीक्षक मोबिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन प्रबोधन’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत खरवते येथे सायबर गुन्हेगारी, नागरिकांची सुरक्षितता, सजगता आणि स्वसंरक्षण अभियान या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालणे, दैनंदिन जीवनातील सुरक्षिततेचे नियम आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व याविषयी विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करून व्यापक जनजागृती करण्यात आली.
या प्रबोधन कार्यक्रमाला खरवते ग्रामपंचायतीचे सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप, ग्रामपंचायत अधिकारी नेहा कुडाळी, पूजा पाटील, मुख्याध्यापक विलास जाधव, खरवतेकर, फावडे, पोलीस पाटील गोरे आणि भास्कर गुरसाळे यांच्यासह परिसरातील सर्व शिक्षक वर्ग, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, केंद्रचालक, स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढत्या डिजिटल युगात नागरिकांनी अधिक सतर्क आणि सजग राहण्याचे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.





