रत्नागिरी: दुर्गम सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीवर मात करत अभियांत्रिकी क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या कोकण रेल्वेने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) आता थेट परदेशात आपले अभियांत्रिकी कौशल्य सिद्ध करणार असून, आफ्रिकेतील काँगो देशात आधुनिक मेट्रो प्रकल्प उभारण्यासोबतच शेजारील श्रीलंकेमध्ये रेल्वे पुलांची उभारणी करणार आहे.
कोकणच्या खडकाळ आणि आव्हानात्मक भूभागावर बोगदे आणि पुलांचे अद्भूत जाळे विणणाऱ्या कोकण रेल्वेच्या तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेवर जागतिक पातळीवर विश्वास व्यक्त केला जात आहे. या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वे आणि विशेषतः कोकण रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सातासमुद्रापार जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँगोमधील शहरी वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मेट्रोचे जाळे उभारणे आणि श्रीलंकेत रेल्वेच्या बळकटीकरणासाठी मजबूत पूल बांधणे ही दोन्ही मोठी आव्हाने कोकण रेल्वेचे तज्ज्ञ अभियंते लिलया पेलणार आहेत.
आपल्या उत्कृष्ट नियोजन, तांत्रिक कौशल्य आणि कठीण भूप्रदेशात काम करण्याच्या दांडग्या अनुभवाच्या जोरावर कोकण रेल्वेने परदेशातील या महत्त्वाकांक्षी कामांची जबाबदारी स्वीकारली असून, लवकरच या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होणार असल्याने जागतिक पटलावर भारताच्या अभियांत्रिकी कौशल्याचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.






