पालशेत/उदय दणदणे: पालशेत-निवोशी ग्रामपंचायत महसूल क्षेत्रातील निवोशी-भेलेवाडी विभागात गेल्या दोन महिन्यांपासून स्ट्रीट लाईट बंद असल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळातही प्रकाश व्यवस्था पूर्ववत न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे.
निवोशी गावातील अनेक वाड्या अतिदुर्गम जंगल भागात असल्याने रात्रीच्या वेळी अंधारामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वन्य प्राणी, सर्प आणि विंचू यांच्या धोक्याचा सामना करत ग्रामस्थांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे स्ट्रीट लाईट बंद असणे ही केवळ गैरसोय नसून सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गौरी-गणपती सणानिमित्त परिसरात आरती, जाखडी नाच, भजन तसेच गणपती दर्शनासाठी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे. मात्र रस्त्यावरील दिवे बंद असल्याने नागरिकांना मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात वाट काढावी लागत आहे. गणेशोत्सवासारख्या सणाच्या दिवसांतही परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे.
गेली दोन महिने स्ट्रीट लाईट बंद असूनही अद्याप प्रकाश व्यवस्था पूर्ववत न झाल्याने ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवोशी-भेलेवाडी विभागातील बंद असलेल्या स्ट्रीट लाईटची तातडीने दुरुस्ती करून संपूर्ण परिसरातील प्रकाश व्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गुहागर : निवोशी-भेलेवाडीत दोन महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य; गणेशोत्सवातही स्ट्रीट लाईट बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल
Leave a Comment





