उदय दणदणे/पालशेत : गुहागर तालुक्यातील पालशेत-निवोशी ग्रामपंचायत हद्दीतील जोईलवाडी येथे गेल्या आठ दिवसांपासून ग्रामपंचायतीचा नळपाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळातच पाणीपुरवठा ठप्प झाल्याने सणाच्या आनंदावर पाणीटंचाईचे सावट आले असून, मुंबई-पुण्यासह विविध शहरांतून गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
नळाला आठ दिवसांपासून पाणी येत नसल्याने जोईलवाडीतील नागरिकांसमोर दैनंदिन गरजेच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः महिलांना दूरवर पायी जाऊन हंडे, बादल्या डोक्यावर घेऊन पाणी आणावे लागत असल्याने महिला वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात पाण्यासाठी होणारी ही पायपीट ग्रामस्थांच्या संतापात भर घालत आहे.
या समस्येबाबत जोईलवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) पालशेत-निवोशी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले. बंद असलेला पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा तसेच तोपर्यंत ग्रामस्थांसाठी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पाणीपुरवठा बंद असतानाही ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणतीही ठोस पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह स्वयंपाक, स्वच्छता आणि इतर दैनंदिन कामांसाठीही नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, याच वर्षापासून ग्रामपंचायतीने पाणीपट्टीत वाढ केली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नागरिकांकडून वाढीव पाणीपट्टीची वसुली केली जात असताना ऐन सणासुदीच्या काळात मूलभूत गरज असलेला पाणीपुरवठाच सुरळीत होत नसेल, तर वाढीव पाणीपट्टी कशासाठी, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पाणीपुरवठ्याच्या या प्रश्नावर महिला वर्गात विशेष नाराजी असून, ग्रामपंचायतीच्या नियोजनाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या पाणीटंचाईची तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करावा आणि तोपर्यंत टँकर अथवा अन्य माध्यमातून पर्यायी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. आता ग्रामस्थांच्या तक्रारीची ग्रामपंचायत व संबंधित प्रशासन कितपत गांभीर्याने दखल घेते आणि पाणीप्रश्न कधी मार्गी लागतो, याकडे जोईलवाडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
गुहागर: ऐन गणेशोत्सवात पालशेत-जोईलवाडीत पाणीटंचाई; महिला वर्गाची हंडा-डोक्यावरून पायपीट
Leave a Comment





