रत्नागिरी (अमित कांबळे): रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील नामवंत पत्रकार तथा बौद्धाचार्य वैभव पवार यांचे रविवार, १८ ऑक्टोबर रोजी मौजे करबुडे कपिलवस्तूनगर येथील संबोधी बुद्धविहारात विशेष प्रबोधनात्मक धम्मप्रवचन संपन्न होणार आहे. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३८, मौजे करबुडे कपिलवस्तूनगर यांच्या वतीने रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याची जय्यत तयारी स्थानिक शाखेकडून पूर्ण झाली आहे.
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी आणि संस्कार समिती रत्नागिरी यांच्या विशेष सहकार्यातून व नियोजनातून प्रतिवर्षी वर्षावास कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील विविध गावशाखांमध्ये धम्मप्रवचन मालिका राबवली जाते. यंदाच्या वर्षावास मालिकेतील अंतिम समारोपीय धम्मप्रवचन करबुडे शाखेत होत असून यामध्ये बौद्धाचार्य वैभव पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. गतवर्षी कोतवडे शाखेमध्ये त्यांनी अत्यंत प्रभावी शैलीत प्रवचन सादर केले होते. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीची दखल घेत तालुका शाखा व संस्कार समितीने त्यांना सलग दुसऱ्या वर्षी या प्रवचन मालिकेत संधी दिली आहे. या कार्यक्रमात ते ‘बौद्ध धम्मातील संस्कारांचे महत्त्व आणि बौद्ध धर्मियांची जबाबदारी’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यक्रम करबुडे गावशाखेचे अध्यक्ष संतोष कृष्णा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. याप्रसंगी मुंबई मंडळाचे अध्यक्ष नथुराम हिरू जाधव, आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा रोशनी राजकुमार जाधव यांच्यासह स्थानिक व मुंबई मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी व सभासद उपस्थित राहणार आहेत. तसेच बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष तथा संस्कार समितीचे अध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार यांच्यासह विविध उपसमित्यांचे पदाधिकारी, सदस्य, श्रामणेर, बौद्धाचार्य, प्रतिनिधी व धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या वैचारिक व प्रबोधनात्मक धम्मप्रवचनाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील धम्मबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करबुडे शाखेचे अध्यक्ष संतोष जाधव आणि तालुकाध्यक्ष प्रकाश पवार यांनी केले आहे.




