दापोली: आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीने संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने दापोली येथील पेन्शनर्स हॉलमध्ये महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत दापोली, मंडणगड आणि खेड परिसरातील पक्ष संघटनेचा सविस्तर आढावा घेऊन जनसंपर्क मोहीम, भावी कार्यक्रम आणि संघटना विस्तारावर सखोल मंथन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषद उमेदवार मिलिंद खैरे यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला, तर पक्षाची विधानसभा आणि तालुका कार्यकारिणी अधिकृतरीत्या घोषित करण्यात आली.
या मेळाव्याला जिल्हा प्रभारी सचिन मोहिते, लोकसभा प्रभारी अनिकेत पवार, जिल्हाध्यक्ष प्रवीण मर्चंडे, जिल्हा बामसेफ संयोजक सुरेश जाधव आणि जिल्हा बीव्हीएफचे भरत पवार उपस्थित होते. त्यांनी पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीसाठी मार्गदर्शन करताना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचणे, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवणे, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि युवकांना संघटनेशी मोठ्या संख्येने जोडण्यावर भर दिला.
जाहीर करण्यात आलेल्या विधानसभा कार्यकारिणीमध्ये जिल्हा सचिव चंद्रसेन मोहिते व सुमेध रुके यांची विधानसभा प्रभारीपदी, तर ॲड. ज्ञानरत्न जाधव यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. महासचिवपदी अनंत मर्चंडे, सचिवपदी ॲड. जयेश जाधव, कोषाध्यक्षपदी संदीप मोहिते आणि सदस्यपदी रत्नदीप कासारे यांची नियुक्ती करण्यात आली. बामसेफ संयोजक म्हणून बाळाराम महाडिक व ॲड. वैभव येलवे, तर बीव्हीएफ संयोजक म्हणून सम्यक जाधव व नितेश येलवे जबाबदारी सांभाळणार आहेत. तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी वीरेंद्र येलवे, उपाध्यक्षपदी माजिदभाई मणियार, महासचिवपदी मिलिंद खैरे, कोषाध्यक्षपदी महेंद्र कासारे, सचिवपदी प्रथमेश महाडिक यांची निवड झाली असून, निलेश येलवे तालुका बीव्हीएफ आणि प्रमोद सावंत तालुका बामसेफ पदाधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा विशाखा मोरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
येत्या पंधरा दिवसांत महिला आघाडी आणि शहर कमिटीच्या स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला असून, सर्व कार्यकर्त्यांनी नियमित बैठकांना हजेरी लावून पक्षविस्तारात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन पक्ष नेतृत्वाने केले आहे.




