दापोली : हिमालयातील अत्यंत दुर्गम आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या घाटरस्त्यांवर दापोलीच्या सायकलस्वाराने आपल्या जिद्दीच्या जोरावर यशस्वी मुसंडी मारली आहे. दापोली सायकलिंग क्लबचे सदस्य व असोंड गावचे सुपुत्र अभिजित मयेकर यांनी हिमाचल प्रदेशात तब्बल ४०० किलोमीटरहून अधिक अंतराची ‘सेल्फ सपोर्टेड’ सोलो सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून कोकणाचे नाव उंचावले आहे. ४ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२६ या बारा दिवसांच्या कालावधीत त्यांनी पठाणकोट, धरमशाला, मंडी ते मनाली या खडतर टप्प्यात ही मोहीम फत्ते केली. ‘क्लीन भारत, ग्रीन भारत’ आणि ‘राईड क्लीन, ब्रिद क्लीन’ हा पर्यावरण संवर्धनाचा अत्यंत महत्त्वाचा संदेश देत मयेकर यांनी स्वतःचे सर्व साहित्य आणि साहित्यसामग्री सायकलवर स्वतः वाहून नेत ही एकट्याने केलेली मोहीम पूर्ण केली.
या साहसी मोहिमेची सुरुवात पठाणकोट येथून झाली. यासाठी त्यांनी आपली सायकल दापोलीहून खेड-मुंबईमार्गे रेल्वेने नेली होती. या प्रवासादरम्यान ऐतिहासिक नूरपूर किल्ला, प्राचीन मंदिरे, महालांचे अवशेष, भाली, शहापूर, मस्तपूर या भागातून मार्गक्रमण करत त्यांनी जागतिक कीर्तीच्या नयनरम्य धरमशाला क्रिकेट स्टेडियमला भेट दिली. पुढे गोपाळपूरचे चहाचे मळे, पालमपूरमधून विलोभनीय दिसणाऱ्या धौलाधार पर्वतरांगा, प्राचीन बैजनाथ शिवमंदिर आणि बीर बिलिंग येथील पॅराग्लायडिंग लँडिंग पॉईंटचा मनसोक्त थरार अनुभवला. जोगिंदरनगरचे युनेस्को मानांकित ऐतिहासिक रेल्वे स्टेशन, टॉय ट्रेन, ब्रिटिशकालीन शानन पॉवर हाऊस पार करत त्यांनी जोहार घाटीतील अतिशय कठीण अशा झटिंगरीचा चढ यशस्वीपणे सर केला. तेथून दिसणारे हिमाच्छादित डोंगर, फुट्टाखलसारखी छोटी खेडी, पारंपरिक लाकडी हिमालयीन घरे आणि विलोभनीय सूर्यास्त अनुभवत हा प्रवास मंडी शहरात पोहोचला.
बियास नदीच्या सोबतीने संथ चढणीचा मार्ग, पंडोह धरण, हनोगी माता मंदिर तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला सफरचंद, प्लम, नाशपाती, जरदाळू आणि डाळिंबाच्या बागांचा नयनरम्य परिसर अनुभवत ही मोहीम अखेर पतलीकुहल मार्गे मनाली येथे सुखरूप संपन्न झाली. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरून थेट हिमालयाच्या गोठवणाऱ्या थंडीत, सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस आणि हजारो मीटर्सची चढण पार करताना निसर्गाचे बदलते रंग आणि स्थानिक लोकांचा निखळ पाहुणचार मनाला विलक्षण समाधान देऊन गेल्याचे मयेकर यांनी सांगितले. हिमालयाच्या वाटांनी जगण्याचा नवा दृष्टिकोन दिला अशी भावना त्यांनी व्यक्त केली असून, या थरारक आणि प्रेरणादायी कामगिरीबद्दल संपूर्ण दापोली तालुक्यासह सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





