दापोली: मोसमी पावसाचा लहरीपणा आणि सततच्या ढगाळ हवामानामुळे दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेले पीक धोक्यात आले असून, ऐन सुगीच्या हंगामात शेतीचे संपूर्ण गणित बिघडून गेले आहे. शेतात जोमात उभी असलेली भात, नाचणी आणि वरी यांसारखी पिके अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे आडवी झाली असून खलाटीतील उभ्या पिकांच्या लोंब्या पाण्यात भिजल्या आहेत. या अस्मानी संकटाशी मुकाबला करताना शेतकऱ्यांना आता कापणीनंतर आपले पीक वाचवण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पिकलेले भात आणि नाचणीची कणसे पावसात भिजून खराब होऊ नयेत, यासाठी शेतकरी सकाळच्या सत्रात तातडीने कापणी करून ती उन्हात वाळवण्याची लगबग करत आहेत. भिजलेली नाचणी काळी पडल्यास ती खाण्यायोग्य राहत नाही, शिवाय पेंढा योग्य रीतीने न सुकल्यास गुरांच्या वैरणीचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
त्यामुळे खळ्यात भाताच्या भारांची उडवी रचून त्यावर तातडीने प्लास्टिकचे पांघरूण घातले जात आहे. एका बाजूला वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाची ही अवकृपा यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. सर्वच ठिकाणी अशीच बिकट स्थिती असल्याने मजुरांची मदत न मिळता प्रत्येकाला स्वतःची कामे स्वतःच रात्रंदिवस राबून करावी लागत आहेत. हाताशी आलेला घास वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या धावपळीमुळे ऐन सुगीच्या दिवसांत बळीराजासमोर अडचणींचा भलामोठा डोंगर उभा ठाकला आहे.






