पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक बळ मिळावे म्हणून केंद्र सरकारच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचे (एनएमएमएस) अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले असून ही परीक्षा २० डिसेंबर रोजी राज्यभरात घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
मान्यताप्राप्त शाळांमध्ये इयत्ता आठवीत शिकत असलेले नियमित विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरतील; मात्र त्यासाठी पालकांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न ३ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. याशिवाय विद्यार्थ्याने इयत्ता सातवीच्या परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळवणे आवश्यक असून अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्क्यांची अट ठेवण्यात आली आहे. विनाअनुदानित शाळा, केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये, शासकीय वसतिगृहे आणि सैनिक शाळांमधील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार नाही. नियमित मुदतीनंतर विलंब शुल्कासह १४ ऑक्टोबरपर्यंत तर अतिविलंब शुल्कासह २१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून, अधिकृत माहिती परिषदेच्या ‘https://mscepune.in/‘ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या परीक्षेमध्ये प्रत्येकी ९० गुणांचे आणि ९० मिनिटांच्या कालावधीचे बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी असे दोन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर घेतले जाणार असून दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमानुसार अतिरिक्त ३० मिनिटांची वेळ दिली जाईल. ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड अशा विविध माध्यमांमध्ये उपलब्ध असणार आहे. अंतिम निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये म्हणजेच वर्षाला तब्बल १२ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट प्रदान केली जाईल. ही शिष्यवृत्ती निरंतर चालू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नववी आणि अकरावी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे अनिवार्य असून, दहावीच्या परीक्षेत खुल्या गटातील विद्यार्थ्यांना किमान ६० टक्के तर एससी व एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ५५ टक्के गुण मिळवणे बंधनकारक राहील.






