संगमेश्वर : गणरायाला निरोप देण्यासाठी बावनदीत उतरलेल्या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला. विसर्जनादरम्यान अचानक पाण्याचा अंदाज चुकल्याने पुरुषोत्तम गुणाजी घडशी आणि त्यांचा मुलगा प्रज्वल घडशी नदीच्या प्रवाहात बुडाले. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे पुरुषोत्तम यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले; मात्र प्रज्वलचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने माभळेसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यावर शोककळा पसरली.
शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडशी कुटुंबीय व ग्रामस्थ संगमेश्वर पोलीस ठाण्यासमोरील बावनदीच्या काठावर गणपती विसर्जनासाठी गेले होते. विसर्जन सुरू असतानाच पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने पिता-पुत्र पाण्यात वाहून जाऊ लागले.
घडलेला प्रकार लक्षात येताच गुणाजी घडशी आणि दत्ताराम घडशी यांनी मदतीसाठी धाव घेतली. प्रज्वलने आजोबांचा हात पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहाने त्याचा हात सुटला.
दरम्यान, श्रीकांत घडशी यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेत पुरुषोत्तम यांना बाहेर काढले. त्यानंतर युवकांनी तब्बल २० मिनिटे शोधमोहीम राबवत प्रज्वलला नदीबाहेर काढले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; मुलाचा दुर्दैवी अंत
Leave a Comment






