संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल येथील निढळेवाडीसारख्या ग्रामीण भागातून कोकणची समृद्ध लोककला आणि भजन संस्कृतीचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या तीन उदयोन्मुख बालकलाकारांचा घरोघरी जाऊन नुकताच विशेष गौरव करण्यात आला. संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलारत्न कु. गौतमी अजय वाडकर, कु. समीक्षा मुरलीधर वाडकर आणि बालगायिका कु. परिणीती सूरज बोंडवलकर या तिघींना सन्मानित करून त्यांच्या कलागुणांना दाद देण्यात आली. निढळेवाडीमध्ये गेली १५ वर्षे अखंडपणे गायन, भजन आणि पारंपरिक संस्कृती संवर्धनाची परंपरा जोपासली जात असून, आजच्या आधुनिक मोबाईल युगातही या चिमुकल्यांनी आपल्या सुरेल आवाजाने भजन क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवला आहे. हा सांस्कृतिक ठेवा नव्या पिढीमध्ये वृद्धिंगत व्हावा आणि ग्रामीण भागातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने नावडी येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी संगमेश्वर वाडी येथील ‘लिटिल स्टार प्री-स्कूल’चे संचालक धनाजी भांगे यांच्या हस्ते या तिन्ही कलारत्नांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागातील प्रतिभेला व्यासपीठ आणि ऊर्जा देणाऱ्या या उपक्रमावेळी तंटामुक्ती अध्यक्ष मुरलीधर वाडकर, प्रतिष्ठित नागरिक जितेंद्र सुतार, सूरज बोंडवलकर, रोशनी बोंडवलकर, अजय वाडकर, भाग्यश्री किल्लेकर, तवसाळ (अंजनवेल) येथील भार्गव किल्लेकर, सुनीता बोंडवलकर, राहुल कुरधुंडकर यांच्यासह निढळेवाडीतील ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निढळेवाडीच्या मातीतील या बालकलाकारांनी भविष्यात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या व्यासपीठांवर कला सादर करून कोकणाचे नाव उज्ज्वल करावे, अशा सदिच्छा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.





