खेड : रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत बिजघर शाळा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. प्रभागातील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत मोठ्या गटात शुभ्रा भगवान जंगम हिने आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत वक्तृत्व स्पर्धेत प्रथम तर निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे लहान गटात अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडवत शौर्य मंगेश मर्चंडे याने वक्तृत्व आणि निबंध या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून दुहेरी यश मिळवले. दोन्ही विद्यार्थ्यांनी विषयाची नेमकी मांडणी आणि प्रभावी सादरीकरण करत उपस्थित मान्यवर व परीक्षकांची मने जिंकली.
खेड शाळा क्रमांक १ येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचे नियोजन स्पर्धा प्रमुख म्हणून केंद्रप्रमुख प्रभाकर कोळेकर, केंद्रप्रमुख राहुल जाधव, दीप्ती यादव, रवींद्र देवळेकर आणि तृप्ती म्हात्रे यांनी चोखपणे पार पाडले. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक शैलेश पराडकर, संदीप घाणेकर, विजय सकपाळ आणि मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बिजघर शाळेच्या या दैदीप्यमान यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी गायत्री माने, खोपी विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी संदीप कंदूरकर, केंद्रप्रमुख महेंद्र जाधव, हेदली केंद्राचे केंद्रप्रमुख सदाशिव राठोड तसेच पतपेढीचे माजी संचालक संतोष उतेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






