रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागातील प्रवाशांचा प्रवास आता अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार असून, ताफ्यातील जुन्या व भंगारात गेलेल्या गाड्यांच्या जागी लवकरच १५० नव्या स्मार्ट एसटी बसेस रस्त्यावर धावणार आहेत. याशिवाय अतिरिक्त १०० राजमाता जिजाऊ बसेस ताफ्यात समाविष्ट करण्याचा प्रस्तावही महामंडळाकडे पाठवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून ५ हजार नव्या स्मार्ट बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू असून, त्यातील महत्त्वाचा वाटा रत्नागिरी विभागाला मिळणार आहे. या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांत २०० हून अधिक बसेस भंगारात निघाल्याने स्थानिक वाहतुकीवर निर्माण झालेला प्रचंड ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
पूर्वी ६५० एसटी बसेस कार्यरत असलेल्या या विभागामध्ये सध्या ५५३ साध्या बसेस, ६० जिजाऊ बसेस, २४ स्लिपर बसेस, २१ ई-शिवाई बसेस आणि १८ शहरी बसेस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध आहेत. मात्र, गाड्यांची संख्या रोडावल्याने विशेषतः रत्नागिरी-कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या मुख्य मार्गांवरील प्रवाशांचे मोठे हाल होत होते. नवीन बसेस दाखल झाल्यानंतर जुन्या आणि खिळखिळ्या बसेसच्या त्रासापासून कोकणातील चाकरमानी व प्रवाशांची कायमस्वरूपी सुटका होणार आहे.
दुसरीकडे, पर्यावरणपूरक प्रवासासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ई-शिवाई’ बसेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात ई-बसेस पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या कामाचे टेंडर काढण्यात आले असून वीजजोडणीचे काम पूर्ण होताच दिवाळीपर्यंत या ई-बसेस प्रत्यक्ष रस्त्यावर धावतील, अशी माहिती विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी दिली आहे. नव्या अत्याधुनिक गाड्यांच्या आगमनाने रत्नागिरी विभागाचा सार्वजनिक वाहतूक चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे.





