मुंबई: भारतीय तटरक्षक दलाने अमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे. या कारवाईत भारतीय तटरक्षक दलाला गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाची (एटीएस) साथ मिळाली.
लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रात समुद्रमार्गे ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सुमारे ५२६ किलो उच्च दर्जाचे अंमली पदार्थ-हेरॉईन आणि मेथॅम्फेटामाइन-जप्त करण्यात आले. तसेच जवानांनी पाच पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.
एका अहवालानुसार, भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले, “भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकासोबत (एटीएस) संयुक्त कारवाई करत लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रात समुद्रमार्गे होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला.”
मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले, “ठोस गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने समुद्र आणि हवाई मार्गाने अचूक पाळत ठेवली. २५ सप्टेंबर २०२६ रोजी इराणची संशयित ‘धो’ प्रकारची नौका सातत्याने पाठलाग करून रोखण्यात आली आणि त्यानंतर तटरक्षक दलाच्या जवानांनी नौकेवर चढून तपासणी केली.”
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्तपणे समुद्रात राबवलेल्या या मोहिमेत सुमारे ५२६ किलो उच्च दर्जाचे अंमली पदार्थ-हेरॉईन आणि मेथॅम्फेटामाइन-जप्त केले. या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३,००० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.सुरक्षा यंत्रणा समुद्रमार्गे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी प्रयत्न तीव्र करत असताना ही मोठी जप्ती करण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दलाने केवळ अंमली पदार्थ जप्त केले नाहीत, तर नौका चालवणाऱ्या पाच पाकिस्तानी नागरिकांनाही ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेली नौका, तिच्यावरील चालक दल आणि जप्त केलेले अंमली पदार्थ सशस्त्र सुरक्षा व्यवस्थेत मुंबईला आणण्यात आले आहेत.
या प्रकरणात अनेक तपास यंत्रणा संयुक्तपणे चौकशी करणार असून, त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तटरक्षक दलाने सांगितले की, या जप्तीमुळे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचे आर्थिक जाळे उद्ध्वस्त करण्यास आणि सिंथेटिक अमली पदार्थ मुख्य भूमीपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यास मदत होईल.भारतीय तटरक्षक दलाच्या या कारवाईतून समुद्री क्षेत्रातील प्रभावी देखरेख आणि कारवाई करण्याची त्यांची क्षमता दिसून येते. तसेच भारतीय समुद्री हद्दीत होणाऱ्या बेकायदेशीर हालचालींना आळा घालण्याच्या तटरक्षक दलाच्या कटिबद्धतेचेही दर्शन घडते.






