संगमेश्वर : पुर्ये तर्फ देवळे येथे नव्याने बांधण्यात आलेला बंधारा अवघ्या दोन दिवसांतच परतीच्या हलक्या पावसात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १६ ऑक्टोबर रोजी पूर्ण झालेला हा बंधारा पहिल्याच पावसात टिकू न शकल्याने कामाचा दर्जा, नियोजन आणि सार्वजनिक निधीच्या वापरावर ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुर्ये तर्फ देवळे गावात माजी उपसरपंच संजीव चव्हाण ऊर्फ बापू लोटणकर यांच्या पुढाकाराने हा बंधारा बांधण्यात आला होता. मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर केवळ दोनच दिवसांत झालेल्या परतीच्या हलक्या पावसात हा बंधारा अक्षरशः वाहून गेला. या घटनेनंतर ग्रामस्थांच्या वतीने भुपाल राजाराम काबदुले यांनी कामाच्या उपयुक्ततेवर आणि नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गावातील विकासकामे ही सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या गरजांचा विचार करून केली पाहिजेत; कोणाच्याही मनमानी कारभाराने नव्हे, असा थेट आक्षेप त्यांनी नोंदवला आहे.
पुर्ये गावात आधीपासूनच ७ ते ८ जुने काँक्रीटचे बंधारे अस्तित्वात असताना नवा बंधारा बांधण्याची घाई का करण्यात आली, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्या जुन्या बंधाऱ्यांची डागडुजी करून त्यातील गाळ काढला असता, तर गावातील १२ पैकी तब्बल १० वाड्यांना मुबलक पाण्याचा थेट लाभ झाला असता. उपलब्ध पर्यायांकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीत केलेल्या या नव्या बांधकामामुळे सार्वजनिक निधी वाया गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. अवघ्या दोन दिवसांत बंधारा वाहून गेल्याने या कामासाठी नेमका किती निधी खर्च झाला, कामाची तांत्रिक तपासणी झाली होती का, आणि या नुकसानीला जबाबदार कोण, याची संबंधित वरिष्ठ शासकीय यंत्रणेने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता पुर्ये ग्रामस्थांमधून केली जात आहे.






