संगमेश्वर : संगमेश्वर ते देवरुख मार्गावरील हनुमान मंदिराच्या पाठीमागे अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणाला संगमेश्वर पोलिसांनी गस्तीदरम्यान रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. मनोजकुमार रामप्रकाश (वय ३२, मूळ रा. रुदलापूर, जि. सिद्धार्थनगर; सध्या रा. शास्त्रीपूल, अब्दुल खान यांच्या भंगार दुकानात, ता. संगमेश्वर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पथक ३ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास हद्दीत नियमित गस्त घालत होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर ते देवरुख जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या हनुमान मंदिराच्या मागील बाजूस एक तरुण अंधारात संशयास्पद रीतीने दबा धरून बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ पुढे जाऊन त्याची चौकशी केली असता, तो तिथे थांबण्याबाबत समाधानकारक कारण देऊ शकला नाही. सूर्यास्तानंतर चोरी करण्याच्या इराद्यानेच तो तिथे संशयितरीत्या वावरत असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संकेत सोपान आटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मनोजकुमार रामप्रकाश याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (क) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




