संगमेश्वर: तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे गावात पाणीपुरवठा करणारी यंत्रणा नादुरुस्त झाल्याने गेल्या बुधवारपासून चार वाड्यांमधील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. ऐन धार्मिक विधींच्या काळात उद्भवलेल्या या भीषण पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांपासून जिल्हा परिषदेपर्यंत धडक मारत तीव्र पाठपुरावा केला. प्रशासकीय कारवाईचा इशारा मिळताच अखेर ग्रामपंचायतीला जाग आली असून गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर आणि ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी संतप्त सवाल उपस्थित केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुर्ये तर्फे देवळे गावातील ओझरवाडी, घडशीवाडी, बौद्धवाडी आणि जांभवाडी या चार प्रमुख वाड्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून पाणीपुरवठा बंद होता. गावात अनसूया विधीचा कार्यक्रम सुरू असतानाच पिण्याच्या पाण्याची ही समस्या निर्माण झाल्याने महिलांसह ग्रामस्थांचे अतोनात हाल झाले. सुरुवातीला स्थानिक ग्रामस्थ संतोष राघो पांगळे यांनी ग्रामसेवक विशाल कांबळे यांच्याशी चर्चा करून तातडीने टँकरद्वारे पर्यायी पाणी देण्याची मागणी केली होती. परंतु, ग्रामपंचायतीकडून टँकर देण्यास असमर्थता दर्शवण्यात आली.
प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थ देवेंद्र राजाराम काबदुले, भूपाल काबदुले, रवींद्र ठाकर, सुरेश गोरुले, वसंत गुरुजी भोवड, यशवंत भोवड, अक्षय भोवड, संतोष भोवड, मंगेश गोरुले आणि संजय चिले यांनी थेट रत्नागिरी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पोलीस अधीक्षकांच्या शेऱ्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे धाव घेतली. जिल्हा परिषदेकडून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत मिळताच हालचालींना वेग आला आणि तातडीने गावात टँकर दाखल झाले.
दरम्यान, नियमित कर भरूनही अशा प्रकारची आणीबाणी उद्भवल्यास ग्रामपंचायतीकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था का नसते, असा रोखठोक सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. ग्रामसेवकांचा संपर्क क्रमांक बंद असणे आणि वरिष्ठ स्तरावर तक्रार केल्यानंतरच टँकर उपलब्ध होणे, यावरून प्रशासकीय जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात दोन दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी बंद राहिल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित कालावधीचे पाणी बिल जबाबदार घटकांकडून वसूल करावे, असा आक्रमक ठराव आगामी ग्रामसभेत मांडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.






