संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा-संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित असलेल्या ऐतिहासिक सरदेसाई वाड्याची मोठ्या प्रमाणात पडझड होत असून, या वास्तूच्या संवर्धनासाठी तातडीने शासकीय पातळीवर कार्यवाही करावी, अशी मागणी समाजसेविका तथा चक्रभेदी सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैदेही सुधीर सावंत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कसबा-संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्याची पाहणी केली असता वास्तूची झालेली दुरवस्था, पडझड आणि दुर्लक्ष स्पष्टपणे निदर्शनास आल्याचे सावंत यांनी निवेदनात नमूद केले आहे. उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार, फेब्रुवारी १६८९ च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज विशाळगडाहून रायगडाकडे जात असताना कसबा-संगमेश्वर येथे मुक्कामी होते. याच परिसरात मोगल सेनापती मुकर्रब खानाच्या सैन्याने त्यांना पकडले होते. त्यामुळे या परिसराला छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेले विशेष महत्त्व असून, सरदेसाई वाड्याचे जतन करणे ही ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सरदेसाई वाड्याची तातडीने शासकीय पुरातत्त्वीय पाहणी करून वास्तूच्या सद्यस्थितीचा पंचनामा करावा, उपलब्ध अवशेष सुरक्षित करावेत आणि पुढील पडझड रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच पुरातत्त्व विभाग, इतिहास संशोधक आणि वास्तुविशारद यांच्या माध्यमातून वास्तूच्या संवर्धनाचा शास्त्रीय व वैज्ञानिक आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सुचविले आहे.
या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची अधिकृत माहिती देणारे माहितीफलक उभारावेत तसेच परिसराचा स्मृतिस्थळ म्हणून विकास करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. कसबा-संगमेश्वरचा हा ऐतिहासिक वारसा पर्यटन आणि इतिहास अभ्यासाच्या दृष्टीने विकसित केल्यास परिसरातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे सावंत यांनी निवेदनात नमूद केले आहे.
“स्वराज्याच्या इतिहासाचे स्मरण केवळ जयंती आणि घोषणांपुरते मर्यादित न राहता ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनातूनही झाले पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीशी निगडित असलेल्या या वास्तूची आणखी पडझड होण्याची वाट न पाहता शासनाने तातडीने कार्यवाही करावी,” अशी भूमिका वैदेही सावंत यांनी मांडली आहे.
दरम्यान, निवेदनावर कोणत्या शासकीय विभागामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे, त्यासाठी किती कालावधी अपेक्षित आहे आणि कोणत्या निधीतून संवर्धनाचे काम केले जाणार आहे, याची लेखी माहिती देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित सरदेसाई वाडा वाचवा; वैदेही सावंत यांचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन
Leave a Comment




