मुंबई: स्वदेशी कार निर्माता टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही श्रेणीतील टाटा सिएराचे ‘डार्क एडिशन’ बाजारात सादर केले आहे. काळ्या रंगातील खास कॉस्मेटिक पॅकेजमुळे सिएराला अधिक आकर्षक आणि दमदार लूक देण्यात आला आहे.
या नव्या डार्क एडिशनची सुरुवात ‘प्युअर एल’ ट्रिमपासून होत असून, स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत त्यासाठी २० हजार रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. त्यानंतरच्या सर्व ट्रिम्ससाठी डार्क एडिशनची किंमत ३० हजार रुपयांनी जास्त आहे. ‘प्युअर एल’ डार्क एडिशनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १३.९९ लाख रुपये असून, टॉप-स्पेक ‘अॅकॉम्प्लिश्ड प्लस’ डार्क एडिशनची किंमत २१.५९ लाख रुपये आहे.
टाटा सिएरा डार्क एडिशनला बाहेरील भागात ‘फ्रिशियन ब्लॅक’ रंगाची फिनिश देण्यात आली आहे. गाडीच्या बहुतांश भागांवरील क्रोमऐवजी काळ्या रंगाचा वापर करण्यात आला असून, टाटा मोटर्सच्या लोगोला आणि अलॉय व्हील्सनाही डार्क लूक देण्यात आला आहे. फ्रंट फेंडर्सवर ‘हॅशटॅग डार्क’ अशी खास बॅजिंगही देण्यात आली आहे. त्यामुळे सिएराच्या या आवृत्तीला स्टेल्थसारखा स्पोर्टी आणि प्रीमियम लूक मिळतो.
गाडीच्या इंटीरियरमध्येही काळ्या रंगाची थीम कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, टाटा मोटर्सने व्हायोलेट मेटॅलिक ट्रिमच्या माध्यमातून आकर्षक रंगसंगती दिली आहे. एसी व्हेंट बेझल, डोअर हँडल, फ्रंट आर्मरेस्ट आणि फ्रंट सीटबॅकसह विविध ठिकाणी ही ट्रिम दिसते. सीट्सवरील स्टिचिंगही पर्पल रंगात देण्यात आले आहे.
फीचर्सच्या बाबतीत स्टँडर्ड सिएराच्या तुलनेत कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. व्हेरिएंटनुसार ट्रिपल-स्क्रीन सेटअप, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॉवर्ड टेलगेट, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, लेव्हल-२ एडीएएस, ३६०-डिग्री कॅमेरा आणि १२-स्पीकर जेबीएल साउंड सिस्टिम यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात.
पॉवरट्रेनमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सिएरा डार्क एडिशनमध्ये १.५-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन १०६ एचपीची ताकद देते. त्यासोबत ६-स्पीड मॅन्युअल किंवा ७-स्पीड डीसीटीचा पर्याय आहे. १.५-लिटर डिझेल इंजिन ११८ एचपीची ताकद देते आणि ६-स्पीड मॅन्युअल तसेच ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स मिळतो. तर १.५-लिटर डायरेक्ट-इंजेक्शन टर्बो पेट्रोल इंजिन १६० एचपीची ताकद देते आणि ते ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्ससोबत उपलब्ध आहे.
टाटा मोटर्सने टाटा सिएरा ‘डार्क एडिशन’ केले लाँच
Leave a Comment





