शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनात रंगला आगळावेगळा क्षण
रत्नागिरी : शासकीय कार्यालयातील प्रशासकीय कामाचा ताण आणि नस्त्यांच्या गराड्यातून बाहेर पडत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी थेट क्रिकेटच्या खेळपट्टीवर उतरून केलेल्या देखण्या फलंदाजीने येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर रंगलेल्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनात अनोखा रंग भरला. केवळ फित कापून किंवा नारळ वाढवून औपचारिकता न पार पाडता, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष २२ यार्डांच्या खेळपट्टीवर बॅट हातात घेत फलंदाजाचा स्टान्स घेतला. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी टाकलेल्या चेंडूचा अचूक वेध घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बॅटच्या मधोमध टोलवलेला चेंडू थेट सीमारेषेपार धावला आणि मैदानावर चौकार नोंदवला गेला. त्यांच्या या कसलेल्या फटक्याने आणि खिलाडूवृत्तीने स्टेडियममधील युवा खेळाडू, पंच आणि उपस्थित क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. आयुष्यात शिस्त जितकी गरजेची आहे, तितकाच खेळातील दिलखुलासपणा जगण्याला नवी उभारी देतो, असा सकारात्मक संदेश देणाऱ्या या अनपेक्षित खेळीने स्पर्धेच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात संस्मरणीय ठरली.
राज्यातील आठ विभागांतील अव्वल क्रिकेटपटूंच्या गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि पुणे हे संघ विजेतेपदासाठी भिडत आहेत. पहिल्या दिवशी रंगलेल्या सलामीच्या लढतीत पुणे विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारत अमरावती संघाला १० षटकांत ९ बाद ३७ धावांवर रोखले. पुण्याच्या रुषभ मोरेने भेदक माऱ्याच्या जोरावर तीन फलंदाजांना माघारी धाडले, तर विजयासाठी मिळालेले ३८ धावांचे माफक आव्हान पुणे संघाने अवघ्या २.३ षटकांत एकही गडी न गमावता ४४ धावा फटकावून सहज पार केले. यामध्ये नेहाल मुल्लाने १२ चेंडूंत नाबाद २८ धावांची वादळी खेळी केली.
दुसऱ्या अत्यंत चुरशीच्या लढतीत कोल्हापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना पृथ्वेश जाधवच्या धडाकेबाज ४६ धावांच्या जोरावर १० षटकांत २ बाद ९८ धावांची भक्कम मजल मारली होती. मात्र, विजयासाठी मिळालेल्या ९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई विभागाने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात ३ बाद १०० धावा कुटून निसटता पण थरारक विजय मिळवला. मुंबईच्या या नाट्यमय विजयात ६० धावांची तुफानी खेळी साकारणारा ओम् बांगर सामन्याचा शिल्पकार ठरला. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी निवड समितीचे सदस्य सर्वेश देशमुख, दीपक मोरे, संदीप गावंडे यांच्यासह तालुका क्रीडा अधिकारी सुनील धारूरकर, क्रीडा अधिकारी गणेश खैरमोडे, सुनील कोळी, गणेश जगताप, पंच आणि क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






