रत्नागिरी : शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरात पहाटेच्या सुमारास उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना समोर आली आहे. वाहन पेटवण्यापूर्वी संबंधित इसमाने गाडीच्या काचा फोडल्याची माहिती असून, आगीमुळे चारचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आठवडा बाजार परिसरात उभ्या असलेल्या चारचाकीजवळ पहाटेच्या वेळी एक संशयित इसम आला. त्याने वाहनाच्या काचा फोडल्यानंतर गाडीला आग लावली. काही क्षणांतच वाहनाने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात दिसू लागल्यानंतर नागरिकांच्या ही घटना निदर्शनास आली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी रत्नागिरी शहर पोलिसांना कळवले. पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन जवानांनी घटनास्थळी पोहोचून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत वाहनाचे मोठे नुकसान झाले होते.
या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली असून, आठवडा बाजार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. वाहनाला आग लावणाऱ्या अज्ञात इसमाची ओळख पटवून त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
रत्नागिरीच्या आठवडा बाजारात अज्ञाताने काचा फोडून चारचाकी पेटवली
Leave a Comment






