मुंबई: महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाची लोकवाहिनी असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर आता स्तनदा माता व बाळांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी १२५ सुसज्ज ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत महामंडळाने केलेल्या महत्त्वपूर्ण सामंजस्य कराराद्वारे हा प्रकल्प आकारास येत असून याकरिता एसटी महामंडळाकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नाही, तर संपूर्ण खर्च टोयोटा किर्लोस्करच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामंजस्य करार संपन्न झाला.
प्रवासादरम्यान महिलांना, प्रामुख्याने स्तनदा मातांना बाळाला दूध पाजण्यासाठी आणि त्याची निगा राखण्यासाठी सुरक्षित, स्वच्छ व खासगी जागा मिळावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत बसस्थानकांवर अंदाजे ३ मीटर × ३ मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड कक्ष उभारले जातील. यामध्ये अंतर्गत वायरिंग, विद्युतीकरण, इलेक्ट्रॉनिक साहित्य, आवश्यक फर्निचर आणि फिक्स्चर यांसारख्या सर्व आधुनिक सुविधा समाविष्ट असतील. पुढील तीन आर्थिक वर्षांत हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन असून, २०२६-२७ मध्ये ५० कक्ष, २०२७-२८ मध्ये ५० कक्ष आणि २०२८-२९ मध्ये उर्वरित २५ कक्ष उभारण्यात येणार आहेत. उपलब्ध जागा, स्थानिक गरज व सीएसआर धोरणानुसार या संख्येत आवश्यकतेनुसार लवचिकता ठेवण्यात आली आहे.
या भागीदारीत एसटी महामंडळामार्फत बसस्थानकांवर सुमारे ५ मीटर × ५ मीटर जागा, पाणी, वीज आणि शासकीय परवानग्या मिळवून देण्याचे सहकार्य केले जाणार आहे. टोयोटा कंपनीकडून कक्षांची उभारणी पूर्ण होऊन ते महामंडळाकडे हस्तांतरित झाल्यानंतर, त्या कक्षांचे दैनंदिन संचालन, सुरक्षितता, देखभाल, दुरुस्ती आणि देखरेखीची जबाबदारी एसटी प्रशासनाची राहील. ‘हिरकणी कक्ष’ हा केवळ सुविधा प्रकल्प नसून मातृत्वाचा गौरव, महिलांच्या गरजांची जाणीव आणि प्रवासी-केंद्रित संवेदनशील एसटी व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले असून, यामुळे ग्रामीण व शहरी भागातील लाखो महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सन्मानजनक होणार आहे.





