पार्किंगसह वाहतूक नियोजनासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांचे निवेदन
चिपळूण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी तसेच गणेशभक्त व नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन शहरात नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी चिपळूण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, गणेशमूर्ती प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणुका तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे शहरातील वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात नागरिक व वाहनचालकांची गैरसोय होऊ शकते.
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवावेत व आवश्यक त्या ठिकाणी डागडुजी करावी. तसेच गर्दीच्या ठिकाणी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी कापडी यांनी केली आहे.
याशिवाय वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवावीत, गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच गणेशोत्सवाच्या मार्गांवर पथदिवे, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
गणेशोत्सव हा चिपळूण शहरातील श्रद्धा व उत्साहाचा महत्त्वाचा सण असून, नागरिकांना सुरक्षित व आनंददायी वातावरण मिळण्यासाठी नगरपरिषदेने उत्सवापूर्वीच आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा मिलिंद कापडी यांनी व्यक्त केली. यावेळी मिलिंद कापडी, जयंद्रथ खताते, शौकतभाई मुकादम, नितिन ठसाळे, योगेश पवार,अदिती देशपांडे, शहनाज वांगडे, दिशा दाभोळकर., उदय ओतारी, शिवानी पवार, सचिन साडविलकर, सचिन पाटेकर, समीर जानवलकर, दादु गुडेकर, पुनम भोजने, पुर्वा आयरे, रवीना गुजर, संदीप जागोष्टे, मनाली जाधव मनोज जाधव, मीरा नारकर, सेजल कारेकर आदी उपस्थित होते.





