रत्नागिरी ( प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री, साठवणूक आणि सेवन करणाऱ्या घटकांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली असून ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत राबवलेल्या विशेष मोहिमेत धडक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही व्यापक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी अमली पदार्थांच्या गैरव्यवहारात गुंतलेल्या ड्रग्ज पेडलर्ससह नशेखोरांवर जोरदार कारवाई करत एकूण १६ गुन्हे दाखल केले असून २२ संशयित आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरोधात १० गुन्हे आणि अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी ६ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या संयुक्त छाप्यांमध्ये ७७ हजार रुपये किमतीचे ५.१५ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन तसेच १ लाख २५ हजार २०० रुपये किमतीचा २.५११ किलोग्रॅम गांजा असा एकूण २ लाख २ हजार २०० रुपयांचा नशिल्या पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तरुण पिढीला आणि समाजाला अमली पदार्थांच्या घातक विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत केवळ प्रतिबंधात्मक कारवायाच नव्हे, तर जनजागृतीपर उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत.
जिल्ह्यात अवैध अमली पदार्थांची तस्करी किंवा विक्री करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहील, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही भागात अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अथवा रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘रत्नसेतू चॅटबॉट’ (९३७१४१५६१२) वर गोपनीय माहिती देऊन सहकार्य करावे, असे अधिकृत आवाहन जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.





