रत्नागिरी: शेअर मार्केटमध्ये आयपीओ (IPO) आणि ओटीसी (OTC) ट्रेडिंगच्या माध्यमातून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याची तब्बल ११ लाख ३७ हजार रूपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या ‘इन्व्हेस्टमेंट फ्रॉड’ प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक कौशल्याच्या जोरावर सोलापूर आणि धाराशिव येथून दोन भामट्यांना जेरबंद केले असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दादासाहेब चौगुले (रा. सोलापूर) आणि तुषार चौधरी (रा. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर ०५/२०२६ नुसार, संशयित आरोपींनी फिर्यादी महिला व तिच्या पतीशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क साधला होता. सुरुवातीला गोड बोलून आणि मोठा परतावा मिळवून देण्याचा बनाव रचून त्यांनी या दाम्पत्याचा पूर्ण विश्वास संपादन केला. त्यानंतर ट्रेडिंग आणि आकर्षक गुंतवणुकीच्या बहाण्याने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी तब्बल ११ लाख ३७ हजार १४ रुपये भरण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आधुनिक सायबर तंत्रज्ञान, बँक खात्यांच्या व्यवहारांचा तांत्रिक मागोवा (मनी ट्रेल), गोपनीय बातमीदार आणि स्थानिक माहितीच्या आधारे सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान मनी ट्रेलमधील आरोपी दादासाहेब चौगुले व ऑपरेटर ट्रेलमधील तुषार चौधरी यांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले आणि रत्नागिरीत आणून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहायक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल आदर्श इंगवले यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, शेअर मार्केट, ट्रेडिंग व ऑनलाइन गुंतवणुकीत कमी वेळेत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर भामट्यांपासून नागरिकांनी अत्यंत सावध राहावे. अनोळखी व्यक्ती, बनावट ॲप्स, व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप्सवर मिळणाऱ्या गुंतवणुकीच्या टिप्सवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका; जास्त परताव्याचे आमिष हा फसवणुकीचा मोठा इशारा असू शकतो, त्यामुळे अधिकृत संस्थांमार्फतच पडताळणी करून आर्थिक व्यवहार करा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे. तसेच अशी कोणतीही आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संबंधित अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






