सावंतवाडी : वर्षा पर्यटनासाठी आंबोली घाटातील मुख्य धबधब्यावर आलेल्या पर्यटकांच्या अंगावर अचानक वरून साप पडल्याने एकच खळबळ उडाली. साप एका कुटुंबातील लहान मुलाच्या अगदी जवळ पडल्याने काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, मुलाने वेळीच थोडे बाजूला सरकल्याने सर्पदंशाचा धोका टळला आणि मोठा अनर्थ होण्यापासून बचाव झाला.
ही घटना रविवारी (१३ सप्टेंबर) सकाळच्या सुमारास आंबोलीच्या मुख्य धबधबा परिसरात घडली. रविवार असल्याने वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीत दाखल झाले होते. यातील काही पर्यटक मुख्य धबधब्यावर पाण्यात भिजण्याचा आणि आंघोळीचा आनंद घेत असतानाच अचानक वरून साप खाली पडला.
धबधब्याच्या ठिकाणी एक कुटुंब पाण्यात आंघोळ करत होते. यावेळी कुटुंबातील व्यक्तीच्या हातातील लहान मुलाजवळच साप पडणार होता. मात्र, साप अंगावर पडण्याच्या क्षणी मुलगा किंचित बाजूला सरकल्याने तो थोडक्यात बचावला. साप अचानक खाली पडल्याचे लक्षात येताच उपस्थित पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली.
या घटनेचा थरारक क्षण काही पर्यटकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. साप नेमका कोणत्या जातीचा होता, याची माहिती मिळू शकली नाही. खाली पडल्यानंतर साप धबधब्यावरील मोठ्या दगडांच्या आडून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
आंबोलीच्या धबधबा परिसरात यापूर्वीही सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी याच धबधब्यावर एका पर्यटकाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे सर्पदंशाची ही घटना ताजी असतानाच पर्यटकांच्या अंगावर साप पडल्याने आंबोली धबधबा परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी धबधबा परिसरात अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
आंबोली धबधब्यावर पर्यटकांच्या अंगावर अचानक पडला साप; चिमुकला थोडक्यात बचावला
Leave a Comment





