मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग सुरू होऊन शैक्षणिक वर्षाचा पहिला टप्पा संपत आला तरी राज्यातील अकरावी प्रवेशप्रक्रियेला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. तीन नियमित फेऱ्यांनंतर सुरू झालेला विशेष फेऱ्यांचा सिलसिला लांबतच चालला असून आता तब्बल १२ वी विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार २८ सप्टेंबर रोजी महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले असून २९ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्याची मुभा देण्यात आली आहे, तर १ ऑक्टोबर रोजी पुन्हा नव्याने रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे.
सध्या राज्यातील ९ हजार ७१८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २२ लाख ४९ हजार ७९ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या १५ लाख ६२ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून ११ लाख ९५ हजार १४० आणि इनहाउस वा व्यवस्थापन कोट्यांतर्गत १ लाख ६७ हजार ९९९ असे मिळून एकूण १३ लाख ६३ हजार १३९ विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. मात्र, तरीही राज्यात तब्बल ८ लाख ८५ हजार ९४० जागा अजूनही रिक्त पडून आहेत. स्वयंअर्थसहाय्याच्या नावाखाली विनाअनुदानित महाविद्यालयांना दरवर्षी मिळणाऱ्या नव्या मान्यता आणि तुकड्या वाढवून घेण्याच्या हव्यासामुळे जागांचा हा मोठा अनुशेष निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सतत वाढत जाणाऱ्या फेऱ्या, बदलणारे नियम आणि लांबत चाललेल्या प्रक्रियेमुळे कनिष्ठ महाविद्यालयांचे नियमित अध्यापन आणि प्रशासकीय नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. यंदा दहावीचा निकाल वेळेत लागूनही प्रवेशाचा खेळ सुरूच राहिल्याने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, असा गंभीर प्रश्न प्राचार्यांसमोर उभा ठाकला आहे. गतवर्षी डिसेंबरपर्यंत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यू-डायस प्रणालीत नोंदवताना अडचणी आल्या होत्या आणि संचमान्यतेतही फटका बसला होता, याची आठवण शिक्षण वर्तुळातून करून दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर, नोंदणी करूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी नेमके कोणत्या अन्य अभ्यासक्रमाकडे किंवा संस्थेकडे वळले, याचा शोध घेण्यासाठी विशेष व्यवस्था उभारली जाईल आणि पुढील वर्षापासून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.






