हिंगोली: एकीकडे मायेचे छत्र हरपल्याने डोळ्यांतील अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीत, तर दुसरीकडे आपला लाडका नातू शेकडो मैल दूर दिल्लीत पोलिसांच्या कोठडीत अडकल्याची भळभळती चिंता; अशा अत्यंत हृदयद्रावक आणि दुहेरी संकटात सापडलेल्या दिपके कुटुंबीयांवर नियतीने अत्यंत क्रूर आघात केला आहे. कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या मूळ गावी वयाच्या अंदाजे ८५ ते ९० व्या वर्षी उपचारादरम्यान सकाळी ११:३० वाजता निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून मधुमेहाचा त्रास आणि पायाला आलेली सूज यामुळे त्या आजारपणाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संतुक पिंपरी गावावर शोककळा पसरली असून सामाजिक व राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. अभिजीत यांच्या प्रत्येक सामाजिक, राजकीय लढ्यात सावित्रीबाईंनी नेहमीच मायेचा आणि खंबीर पाठिंबा दिला होता; मात्र आज त्याच लाडक्या नातवावर आजीच्या अखेरच्या दर्शनापासून वंचित राहण्याची अत्यंत वेदनादायी वेळ ओढवली आहे.
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाचे नेतृत्व करताना दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्याने राजधानीत हायव्होल्टेज ड्रामा सुरू असतानाच, दुसरीकडे गावात आजीचा श्वास थांबल्याने दिपके कुटुंबाचा आधारच कोसळला आहे. अवघ्या पंचवीस दिवसांपूर्वी एका आंदोलनादरम्यान अभिजीत यांनी आजीची शेवटची भेट घेतली होती, तीच त्यांची अंतिम भेट ठरेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. “माझा अभिजीत आज इथे असता तर खूप चांगलं वाटलं असतं,” अशा कातर आणि पाणावलेल्या आवाजात अभिजीतचे काका विलास दिपके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ज्यावरून कुटुंबातील विरह आणि वेदनेची तीव्रता स्पष्ट होते. सावित्रीबाईंचे पार्थिव संतुक पिंपरी येथील स्मशानभूमीत उद्या सकाळी १०:०० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार असून कुटुंबातील इतर सदस्य आणि नातवाच्या पत्नीच्या आगमनाची प्रतीक्षा केली जात आहे. मात्र, दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेले अभिजीत दिपके या बिकट प्रसंगी आपल्या मूळ गावी वेळेत पोहोचू शकतील का आणि आजीला अखेरचा निरोप देऊ शकतील का, या विवंचनेने दिपके कुटुंबासह संपूर्ण गावाची चिंता अधिकच वाढवली आहे.






