मुंबई : डॉक्टर ही केवळ एक पदवी नसून रुग्णांचा आणि समाजाचा विश्वास संपादन करणे हीच खरी कमाई आहे; रुग्णालयात वेदना व चिंता घेऊन येणारा रुग्ण उपचारानंतर समाधानाने घरी परतणे हेच वैद्यकीय सेवेचे खरे यश ठरते, असे प्रतिपादन करत नव्याने रुजू झालेल्या डॉक्टरांनी समर्पण, सेवाभाव, उत्तम रुग्णसंवाद आणि संवेदनशीलतेने कर्तव्य बजावावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात एकाच वेळी १ हजार ४४० नवनियुक्त एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये सुमारे ७०० महिला डॉक्टरांचा समावेश असून, या मोठ्या भरतीमुळे विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व गतिमान होणार आहे. यावेळी १२ डॉक्टरांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्रे सुपूर्द करण्यात आली. प्रशासकीय ‘फाईल’ तयार होण्यापूर्वी गरजू रुग्णाला तत्काळ उपचार मिळाले पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका मांडत लवकरच आणखी ६२१ डॉक्टरांची भरती केली जाईल, अशी घोषणाही उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. तसेच रुग्णसेवेचा ताण सांभाळणाऱ्या या डॉक्टरांसाठी चांगले निवासस्थान, स्वच्छ व सुरक्षित परिसर, विरंगुळा आणि क्रीडा सुविधांसारखे पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी शासन निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्यातील एकही प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय डॉक्टरविना राहू नये, हा शासनाचा निर्धार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी स्पष्ट केले. सुमारे १० हजार उमेदवारांमधून अत्यंत पारदर्शक प्रक्रियेद्वारे या डॉक्टरांची निवड करण्यात आली असून त्यांनी जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे आवाहन त्यांनी केले. आरोग्य सेवेचा विस्तार करतानाच आगामी काळात आणखी ६०० डॉक्टरांची भरती, उपकेंद्रांमध्ये १ हजार ९०० समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती, ३५० नवीन ‘१०८’ रुग्णवाहिकांचे लोकार्पण आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या समारंभास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





